Mark 9

येशूचे रूपांतर

1येशू त्या लोकांस म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की, ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.” 2सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले. 3त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शुभ्र करता येणार नाहीत, अशी झाली होती.

4तेव्हा एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रकट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते. 5पेत्र येशूला म्हणाला, “रब्बी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” 6पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्यास समजेना कारण ते भयभीत झाले होते.

7तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.” 8अचानक, त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही.

9ते डोंगरावरून खाली येत असता, येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मरण पावलेल्यातून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.” 10म्हणून त्यांनीही गोष्ट त्यांच्यातच ठेवली, परंतु ते मरण पावलेल्यातून उठणे याचा अर्थ काय याविषयी आपसात चर्चा करीत होते.

11त्यांनी येशूला विचारले, “प्रथम एलीया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणातात?” 12तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही व्यवस्थितपणे करतो हे खरे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे? 13मी तुम्हास सांगतो, एलीया आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे, त्यांना पाहिजे तसे त्यांनी त्याचे केले.”

शिष्य भूतग्रस्त मुलाला बरे करण्यास असमर्थ

14नंतर ते शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांना त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय आहे आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्याच्याशी वाद करत आहेत असे त्यांना दिसले. 15सर्व लोक येशूला पाहताच आश्चर्यचकित झाले आणि ते त्याचे स्वागत करण्यासाठी धावले. 16येशूने शिष्यांना विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात?”

17तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही. 18आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”

येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो

19येशू त्यांना म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? मी तुमच्याबरोबर कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.”

20नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. 21नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?” वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे. 22पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा.”

23येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.” 24तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.” 25येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.”

26नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला. 27परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला.

28नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्यास एकांतात विचारले, “आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही?” 29येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.”

आपल्या मृत्युबद्दल येशूने दुसऱ्यांदा केलेले भविष्य

30ते तेथून निघाले आणि गालील प्रांतातून प्रवास करीत चालले होते. हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती. 31कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्यास ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.” 32पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यास ते भीत होते.

नम्रतेविषयी धडा

33पुढे ते कफर्णहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?” 34परंतु ते गप्प राहिले कारण वाटेत त्यांनी सर्वांत मोठा कोण याविषयी चर्चा चालली होती. 35मग येशू खाली बसला, त्याने बाराजणांना बोलावून त्यांना म्हटले, “जर कोणाला पहिले व्हावयाचे असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”

36मग येशूने एक बालकास घेऊन त्यांच्यामध्ये उभे केले व त्यांना म्हणाला? 37“जो कोणी या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठवले त्याचाही स्वीकार करतो.”

सहिष्णुतेची शिकवण

38योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भूते काढताना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आपल्यापैकी नव्हता.” 39परंतु येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही.

40जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. 41मी तुम्हास खरे सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हास जो कोणीएक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.”

इतरांना अडखळवण्याविरूद्ध इशारा

42माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे. 43
This verse is empty because in this translation its contents have been moved to form part of verse Mrk 9:44.
In this translation, this verse contains text which in some other translations appears in verses Mrk 9:43-Mrk 9:44.
44जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.

45
This verse is empty because in this translation its contents have been moved to form part of verse Mrk 9:46.
In this translation, this verse contains text which in some other translations appears in verses Mrk 9:45-Mrk 9:46.
46आणि जर तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे.

47
This verse is empty because in this translation its contents have been moved to form part of verse Mrk 9:48.
In this translation, this verse contains text which in some other translations appears in verses Mrk 9:47-Mrk 9:48.
48जर तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे.

49कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल. “मीठ चांगले आहे. जर मीठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने रहा.”

50

Copyright information for MarULB